कै. आहिताग्नि शंकर रामचंद्र राजवाडे
जन्म - १३. १०. १८७९, मृत्यू - २७. ११.१९५२

 

आहिताग्नि राजवाडे यांचें , भारतीय तत्त्वज्ञान व संस्कृति यांच्या क्षेत्रांतील , कार्य  भाष्ययुगांतील प्राचीन भारतीय आचार्यांना शोभण्यासारखें आहे. तथापि त्यांनी विशिष्ट संप्रदाय मात्र अर्वाचीन युगमानाचा विचार करून स्थापन केला नाही. वैदिक धर्मांत निवृत्तिपर विचारांचें स्तोम माजल्यामुळें आपल्या सामाजिक अवनतीला प्रारंभ झाला हें  सर्व इतिहासपंडित व समाजशास्त्रज्ञ मान्य करतात. तथापि त्या वैदिक धर्माचें व तत्त्वज्ञानाचें प्रवृत्तिपर अंग न्यायशास्त्र व आधुनिक विज्ञान यांच्या पायावर भक्कम स्थापित करण्याचें महत्कार्य राजवाडे यांनीच आपल्या प्रचंड भाष्यग्रंथाच्या द्वारें केलें. सुदैवानें त्यानीं हें ग्रंथ , प्राचीन आचार्यांप्रमाणें न्यायघटित सूत्रमय संस्कृतांत न लिहिता प्रौढ-मधुर  मराठी गद्यांत लिहिलें आहेत. त्यांचे ग्रंथ म्हणजे अर्वाचीन सुशिक्षितांना भारतीय संस्कृतीचे प्रवृत्तिपर आणि प्रगतिक्षम स्वरूप दाखविणारें एक महान 'दर्शन' च होतं .

-एक अभ्यासक

 

विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील 'आहिताग्नि राजवाडे' हे एक चतुरस्त्र, व्यासंगी व्यक्तिमत्व होते. वैदिक परंपरेतील 'अग्निहोत्र' व्रत स्वीकारल्यापासून 'आहिताग्नि' ही उपाधी त्यांच्या नावामागे जोडली गेली ती कायमचीच. 


कोकणातील देवरुखजवळील 'निवे' हे त्यांचे मूळ गाव होते. त्यांचे वडील रामचंद्र राजवाडे सरकारी सेवेत नोकरीस होते. आहिताग्नि यांचे बी.ए. पदवीपर्यंतचे शिक्षण पुण्यात डेक्कन कॉलेज येथे झाले. त्यांचे वास्तव्य 'अग्निहोत्र मंदिर' २८६ सदाशिव पेठ, पुणे या स्वतःच्या वाड्यात होते. राजवाडे यांचे विविध विषयांवरील वाचन प्रचंड होते, स्मरणशक्ती विलक्षण होती. ते एकपाठी होते. डेक्कन कॉलेजमधले त्यांचे गुरु प्रि.बेन, जर्मन तत्वज्ञ नीट्झ्से, विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक आदी विचारवंतांचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता.

 

त्यांच्या व्यासंगाचा परिघ मुळातच अफाट होता कारण संस्कृत, इंग्रजी, फ्रेंच भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते तर जर्मन, लॅटिन, ग्रीक भाषाही त्यांना अवगत होत्या. त्यामुळे कार्ल च्या 'दास कापिताल' चे मूळ जर्मनमधून वाचन, फ्रेंच भाषेतून केलेला फ्रेंच राज्यक्रांतीचा अभ्यास, भारतीय तत्त्वज्ञान व पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाचा त्यांनी केलेला तौलनिक अभ्यास अशासारखी वैशिष्ट्यपूर्ण उदाहरणे त्यांच्या ज्ञानोपासक वृत्तीची  निदर्शक म्हणून सांगता येतील.


ज्येष्ठ विचारवंत लेखक प्रा.श्री.के.क्षीरसागर यांनी लिहिल्याप्रमाणे, "त्यांचे लेखनाचे विषय कलास्वरूपापासून  (Aesthetics)'निर्द्वंद्वाच्या  तत्वज्ञानापर्यंत विविध असलेले दिसून येतील.परंतु अद्वैत सिद्धांतांऐवजी 'निर्द्वंद्व' सिद्धांत प्रस्थापित करणे हे त्यांच्या प्रचंड लेखनाचे पालुपद होते. आहिताग्नि महाविद्वान होते, स्पष्टवक्ते होते आणि वक्तृत्व त्यांच्या रोमारोमात भिनले होते."                


आयुष्यभर त्यांनी फक्त स्वानंदाकरिता ज्ञानसंग्रह आणि ग्रंथलेखन केले. हिंदुस्थानभर दौरे करून धर्म, तत्त्वज्ञान आणि इतिहास या विषयांवर व्याख्याने दिली असे हे आहिताग्नि कलारसिकही होते. संगीत, काव्य, साहित्य, नाटक, खेळ त्यातही क्रिकेट अशा विविध गोष्टींमध्ये त्यांना रस होताच आणि जाणकारीही होती. 

अहिताग्नि यांची ग्रंथसंपदा पुढीलप्रमाणे :-


आहिताग्नि यांची ग्रंथसंपदा पुढीलप्रमाणे :-
'गीताभाष्य'
'नासदीयसूक्तभाष्य'
नीट्झ्सेचा ख्रिस्तान्तक आणि ख्रिस्तान्तक नीट्झ्से
'ईशावास्योपनिषद्भ।ष्य'
'षड्दर्शनेसमन्वय' आणि 'पुरुषार्थमीमांसा' '
वैदिक धर्म आणि षड्दर्शनें अथवा चार विद्या व सहा शास्त्रे
सनातन वैदिक धर्म
आहिताग्नि राजवाडे आत्मवृत्त

इति

विशाल रणखांब
एम .ए. एम. फिल.

(सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ , पुणे )


विशेष सूचना : कै.आहिताग्नि राजवाडे यांच्या संकेतस्थळावर टप्याटप्याने त्यांचे काही लेखन पुनःप्रकाशित केले जाईल याची वाचकांनी / अभ्यासकांनी/ जिज्ञासूंनी नोंद घ्यावी ही विनंती.

 


 
© www.ahitagni-rajwade.com
Developed By Maitraee Graphics