छायाचित्रे मोठी करून बघण्यासाठी छायाचित्रावर क्लिक करा
आहिताग्नि आपल्या वाड्याच्या चौकात ज्ञानसत्र भरवीत असत.याच वाड्याच्या चौकात १९३२- ३३ च्या दरम्यान व्याख्यानाचा विषय होता 'फ्रेंच राज्यक्रांती'. तत्त्वज्ञानाबरोबरच इतिहास हाही त्यांच्या अभ्यासाचा आणि प्रेमाचा विषय. शिवाजीमहाराज आणि नेपोलियन बोनापार्ट हे त्यांचे 'हिरो' होते. एका शारदीय ज्ञान सत्रात त्यांनी 'फ्रेंच राज्यक्रांती' हा विषय निवडला त्यासाठी फ्रेंच भाषेचा अभ्यास केला आणि फ्रेंच भाषेतूनच इतिहास वाचला, अभ्यासाला. व्याख्यानाचा कालावधी किती होता? एक दिवस नाही, दोन दिवस नाही तर तब्बल महिनाभर या विषयावर त्यांनी व्याख्याने दिली होती हा इतिहास, त्यातले योद्धे, विचारवंत सारीच नावं सामान्यांसाठी परकी, अनोळखी, या लोकांनी राज्यक्रांतीतील कुणाचे फोटो पाहण्याचीही शक्यता नव्हती."माझे विचार सामांन्यापर्यंत पोहोचायला हवेत." असं आहिताग्नि नेहमीच म्हणत असत. याच विचारातून आपली मुलगी कु.शकुंतला (माझ्या सासूबाई- शकुंतला आठवले) हिच्या कडून त्यांनी एकशेएक व्यक्तिचित्रं काढून घेतली. शिसवी लाकडाच्या फ्रेम्स बनवून व्याख्यानाच्यावेळी ही सर्व चित्रं चौकात लावली होती. हेतू हा की, आपण राज्यक्रांतीतील कुठ्ल्या व्यक्ती विषयी बोलतो आहोत हे श्रोत्यांना कळावं आणि त्यांना व्याख्यानात रस वाटावा. एवढी चित्रं रेखाटणं हे काम शकुंतलासाठी सोपं नव्हतं. कारण चित्रकलेचं फारसं मार्गदर्शन तिला मिळालं नव्हतं पण उपजत चित्रकला तिच्या बोटात होती आणि आवश्यक नजरही होती. त्यामुळे चार, पाच इंचाच्या मूळ फोटोवरून तिने दीड दोन फूट लांबी, रुंदीची व्यक्तिचित्रं काढली. व्याख्यानानंतर १९३५ साली आहिताग्नि यांनी पुन्हा या चित्रांचं प्रदर्शन वाड्याच्या चौकात भरवलं होतं.त्यानिमित्तानं एक पुस्तिकाही प्रकाशित केली, तिची किंमत होती एक आणा. पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक लोकं प्रदर्शन पाहून गेले, त्यात इंग्रज अधिकारीही होते. कॉलेजमध्ये शिकणाऱ्या या विद्यार्थिनीची चित्रं पाहून सर्वाना आश्चर्य वाटलं आणि कौतुकही ! राजवाड्यांनी लेकीला शाबासकी देत तिचा सत्कार घडवून आणला. फार दूरदृष्टीनं 'visual'या माध्यमाचा त्यांनी केवढा विचार केला होता, हे आज लक्षात येतंय.
बालगंधर्व रंग मंदिर पुणे येथे दिनांक ४ मे ते ६ मे १९९५ फ्रेंच राज्यक्रांती प्रदर्शन पार पडले. आहिताग्नि राजवाडे यांच्यावरील संकेतस्थळाचा उदघाटन समारंभ दि. २७.११.१६ रोजी झाला. |
---|