'गीताभाष्य' आणि 'ईशावास्योपनिषद्भाष्य'

या संकेतस्थळावर सुरुवातीला 'गीता -भाष्य ' आणि 'ईशावास्योपनिषद्भाष्य ' हे आहिताग्नि राजवाडे यांनी लिहिलेले दोन ग्रंथ वाचकांना उपलब्धकरून दिले आहेत. काही कालावधीनंतर अजून काही ग्रंथ या संकेतस्थळावर उपलब्ध होतील.

       

गीताभाष्य

स्वतः आहिताग्नि  राजवाडे यांनी ग्रंथनिवेदनात लिहिले आहे,"श्रीमद भगवद्गीतेत जो कृष्णार्जुनसंवाद आहे तो 'ब्रह्मविद्या' व 'योगशास्त्र' यांना धरून आहे . 'ब्रह्मविद्या' म्हणजे समष्टिविद्या किंवा 'समाजशास्त्र' होय. त्याचप्रमाणे योग म्हणजे मनुष्याने कर्तव्य म्हणून आचरावयाचा कर्मयोग, मनुष्याचे नियतकर्म किंवा नैतिककर्म, अशी योग शब्दाची व्याख्या आहे. म्हणून योगशास्त्र म्हणजे कर्मयोगशास्त्र किंवा 'नीतिशास्त्र' होय. या प्रमाणें भगवद्गीता ही मुळांतच  'नीतिशास्त्र' व 'समाजशास्त्र' या उभयतांना धरून आहे.

हे गीता भाष्य सर्वतोपरि नवीन धर्तीचें  व नवीन विचारांचें आहे. हे कोणत्याही पूर्वीच्या भाष्याचें भाषांतर नाहीं, रूपांतर नाहीं किंवा अनुरूप कृति नाही.यात गीतेच्या प्रत्येक श्लोकाचें  विवरण केवळ नीतीच्या व समाजाच्या दृष्टीनें अगदी स्वतंत्रपणे पृथक्करणपूर्वक केलें आहे , व त्यांत आरंभापासून अखेरपर्यंत गीतेची संगति गीतेच्याच शब्दांनी लावून दाखविली आहे. याची रचना नवीन पद्धतीची जागोजाग रेषाकृति, वंशक्रम, तुलनादर्शक कोष्टकें वगैरे देऊन विषय अगदी सोपा व सुगम करून दाखविणारी आहे. यांत जेथें शास्त्रीय विषयाचा अधिक विस्तार करण्याचा प्रसंग आला आहे तेथें त्याकरितां त्या त्या अध्यायाचें शेवटीं स्वतंत्र परिशिष्टें  जोडली आहेत. असें हें  विविध विषयांनी ओतप्रोत भरलेलें, व पाश्चात्त्य  व पौरस्य संस्कृतीची अंतर्बाह्य तुलनेनें  पूर्ण गुणदोषमीमांसा करणारें  गीतार्थविवरण आधुनिक इंग्रजी पद्धतीच्या सुशिक्षितांना सहज परिचयाचें  वाटून, त्यापासून त्यांना प्राचीन आर्यविद्यांचा व अर्वाचीन  पाश्चात्त्य  विद्यांचा कोठें  व कसा मेळ बसतो, व कोठें व कसा विरोध येतो, हें निश्चयपूर्वक समजेल, आणि जुन्या संस्कृत पद्धतीच्या सुशिक्षितांना पाश्चात्त्य विद्या, कला व शास्त्रें  यांतील विचारांची दिशा काय आहे ती ऐतिहासिक व औत्क्रांतिक पद्धतीनें  संक्षेपतःएका ठिकाणी पहावयास सापडेल".

गीता-भाष्य (डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा )

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

ईशावास्योपनिषद्भाष्य

या ग्रंथापूर्वी आहिताग्नि राजवाडे यांचा 'नासदीयसूक्तभाष्य' हा ग्रंथ प्रसिद्ध झाला होता.
 'ईशावास्योपनिषद्भाष्य' या ग्रंथाच्या ग्रंथोपन्यासात ते लिहितात, "नासदीय सूक्तात जगतपूर्व काय होतें याचा विचार आहे. ईशावास्यांत  जगतांत  काय आहे तें  दर्शविलें आहे"."नासदीयसूक्तांत  अस्तिनास्तींचा संशय उत्पन्न करून अस्त्तिपक्षीं निर्णय लावला आहे. तोच पुढें  ईशावास्यांत 'ईश' शब्दानें  अवतरित होऊन अमृतापर्यंत पोंचला  आहे."

 

 

अखेरीस ते लिहितात


"हे ईशावास्योपनिषद्भाष्य भरतखंडांत महाराष्ट्रदेशांत
मुळामुठातीरीं पुण्यक्षेत्रीं शांडिल्यगोत्रोत्पन्न राजवाडे
इत्युपनाम रामचंद्रसुत शंकरशर्मा आहिताग्नि
यानें निर्द्वंद्वतत्वाच्या दृष्टीनें अद्वैत मताचें
खंडन करून मराठी भाषेंत रचिलें."


विशेष म्हणजे या ग्रंथात जवळजवळ शंभर पृष्ठं आहिताग्नि यांनी भौतिकशास्त्रावर (Physics) लिहिली आहेत.

ईशावास्योपनिषद्भाष्य (डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा )

'नासदीयसूक्तभाष्य'

'नासदीयसूक्तभाष्य' हा ऋग्वेदातील नासदीय सूक्तावर आधारे लिहिलेला सव्वादोन हजार पानांचा ग्रंथ चार खंडात विभागला आहे.त्यांतील पहिला खंड या संकेतस्थळावर ठेवत आहोत.

'नासदीयसूक्तभाष्य'(डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा )

 
© www.ahitagni-rajwade.com
Developed By Maitraee Graphics