संकेतस्थळ निर्मितीबद्दलची भूमिका

आवाहन - आहिताग्नि राजवाडे यांचे काही अप्रकाशित लेखन, हस्तलिखितं आपल्याकडे असल्यास कृपया या संकेतस्थळावर संपर्क साधावा.

सर्व मराठी वाचकांना आमचा नमस्कार. या संकेतस्थळावरून तुमच्या - आमच्यात असलेले हजारो मैलाचे अंतर पार करून तुमच्याशी थोडे बोलावेसे वाटतंय म्हणूनच संकेतस्थळाची ठरविक परिभाषा बाजूला ठेवून औपचारिकतेच्या भिंती ओलांडून जगाच्या पाठीवर कुठेही असलेल्या तुम्हा सर्वांसाठी आमचे हे मनोगत. तुमच्याशी एक  शब्दभेट...

२० व्या शतकाच्या पूर्वार्धातील ज्या विद्वान व्यक्तीचे लेखन आम्ही आपल्यापुढे ठेवत आहोत, ते वाचण्यापूर्वी त्यांची थोडी ओळख करून घ्या. खरेतर त्यांच्या संदर्भात हे असं म्हणणं धाडसाचंच ठरेल कारण आयुष्यभर फक्त स्वानंदाकरता ज्ञानसंग्रह आणि ग्रंथलेखन करणाऱ्या, हिंदुस्थानभर दौरे करून धर्म, तत्त्वज्ञान आणि इतिहास या विषयांवर व्याख्यानं देणाऱ्या या ज्ञानोपासकाची थोडक्यात ओळख कशी काय करून देणार? तरीही आम्ही तो प्रयत्न करतो आहोत म्हणूनच वाचकांना विनंती आहे, या मुक्कामी जरा थांबा, वाचा आणि पुढे चला...


या व्यासंगी, विद्वान व्यक्तीचं नाव आहे आहिताग्नि शंकर रामचंद्र राजवाडे. 'अग्निहोत्र मंदिर', २८६, सदाशिव पेठ, पुणे (महाराष्ट्र ), इथे त्यांचे वास्तव्य होतं. 'अग्निहोत्र' घेतले असल्यामुळे ही उपाधी त्यांच्या नावाशी जोडली गेली ती कायमचीच . १३.१०.१८७९ ते २७.११.१९५२ हा त्यांचा कालखंड. यंदा त्यांचा ६४ वा स्मृतिदिन आणि त्यांच्या 'गीता भाष्य' ग्रंथाचं शताब्दी - वर्ष आहे. इतर बऱ्याच लेखनाला ६ दशकांहून अधिक काळ लोटला आहे अशा अर्थानं आहिताग्नि हे एक विस्मृतीत गेलेलं व्यक्तिमत्त्व. संस्कृत, इंग्रजी आणि फ़्रेंच भाषांवर प्रभुत्व असलेल्या राजवाड्यांविषयी व्यासंगी लेखक प्रा. कै. श्री.के.क्षीरसागर यांनी लिहिलं आहे; "आहिताग्नि यांच्या लेखनाचे विषय कलास्वरूपापासून  (Aesthetics)''निर्द्वंद्वाच्या' तत्त्वज्ञानापर्यंत  विविध असलेले दिसून येतील.परंतु अद्वैत सिद्धांतांऐवजी 'निर्द्वंद्व' सिद्धांत प्रस्थापित करणे हे त्यांच्या प्रचंड लेखनाचे पालुपद होते. आहिताग्नि महाविद्वान होते, स्पष्टवक्ते होते आणि वक्तृत्व त्यांच्या रोमारोमात भिनलेले होते". ही त्यांची ओळख अगदी योग्य आहे परंतु कुठल्याही  विचारवंत लेखकाची ओळख त्याच्या लेखनातून अधिक होते.          

म्हणूनच या संकेतस्थळावरून आम्ही टप्प्याटप्प्याने  पुनःप्रसिद्ध  करत असलेल्या त्यांच्या लेखनातून, त्यांच्या विषयी इतरांनी लिहिलेल्या लेखांमधून आणि चिकित्सक अभ्यासातून तयार झालेल्या प्रबंधातून या विद्वान व्यक्तीचा व्यासंग, संशोधक-संग्राहक वृत्ती, अलौकिक बुद्धिमत्ता आणि आपल्या विचारांशी ठाम राहण्याचं असामान्य धैर्य ....  ही त्यांची ठसठशीत अशी ओळख आहे हे मान्य करूनही त्यांच्याविषयी असा सरळ एका रेषेत, ढोबळ मानानं बोलता येणार नाही, सांगता येणार नाही.कारण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला कायमच दोन बाजू होत्या. एका बाजूला प्रचंड व्यासंग, संशोधन, व्याख्यानं, हजारो पानांचं लेखन ... त्यामुळे समाजात त्यांच्याविषयी आदर होता.आदरयुक्त दबदबा होता तर दुसऱ्या बाजूला 'सनातनी' म्हणून त्यांच्यावर बसलेला शिक्का! या दोन्ही बाजू खऱ्या आहेत त्या नाकारता येणार नाहीत. त्यांचे काही विचार त्याही काळात वादग्रस्त होते, आज त्या विचारांचा निषेधच होईल. आम्हीही  अशा वादग्रस्त विचारांचा पुरस्कार करत नाही परंतु असे काही विचार बाजूला ठेवूनही त्यांच्या प्रत्येक ग्रंथाच्या अनुषंगाने इतर अनेक विषयांचे त्यांनी केलेलं विवेचन, त्यांचं संशोधन आणि निष्कर्ष ... हे उद्याच्या विचारवंतांसाठी, लेखकांसाठी संदर्भग्रंथ ठरू शकेल. त्यामूळे आहिताग्नि पूर्णपणे स्वीकारता आले नाहीत तरी पूर्णपणे नाकारताही येत नाहीत.

'गीताभाष्य' या आपल्या पहिल्या ग्रंथापासूनच त्यांनी आपली स्वतंत्र 'वाट' अधोरेखित करत नंतरच्या काळात ती 'निर्द्वंद्व' तत्वज्ञानापर्यंत नेऊन ठेवली. 'गीता-भाष्य' ग्रंथाच्या ग्रंथनिवेदनात त्यांनी लिहिलं आहे;"हे गीताभाष्य सर्वतोपरि  नवीन धर्तीचे व नवीन विचारांचे आहे. हे कोणत्याही पूर्वीच्या भाष्याचे भाषांतर नाही, रूपांतर नाही किंवा अनुरूप कृति नाही, यात गीतेच्या प्रत्येक श्लोकाचे विवरण केवळ नीतीच्या व समाजाच्या दृष्टीने अगदी स्वतंत्रपणे पृथ्थकरणपूर्वक केले आहे व त्यात आरंभापासून अखेरपर्यंत गीतेची संगती गीतेच्याचब्दांनी लावून दाखविली आहे. यातील गीतार्थ विवरण पूर्णपणे ऐतिहासिक, औत्क्रान्तिक व तौलनिक आहे. याची रचना नवीन पद्धतीची जागोजाग रेषाकृती, वंशक्रम, तुलनादर्शक कोष्टके वगैरे देऊन विषय अगदी सोपा करून दाखविणारी आहे". हे 'गीता भाष्य' आधुनिक इंग्रजी पद्धतीच्या सुशिक्षितांनाही सहज परिचयाचे वाटेल हेच आहिताग्नी यांचे  वेगळेपण आहे. पूर्वसूरींचा, परंपरांचा अभ्यास ही त्यांच्या एकूणच ग्रंथलेखनाची मूळ 'वीट' आहे. त्या विटेवरच त्यांच्या टोलेजंग ग्रंथलेखनाची, नव्या अन्वयार्थांची इमारत ठामपणे उभी राहिलेली दिसते. 

  'नासदीयसूक्तभाष्य' हा ऋग्वेदातील  नासदीय सूक्तावर आधारे लिहिलेला सव्वादोन हजार पानांचा ग्रंथ चार खंडात विभागला आहे. या ग्रंथातील दोन खंड हे प्रौढ अभ्यासकांसाठी शरीरशास्त्र आहे त्यामध्ये विवाहशास्त्र, जननशास्त्र, कुटुंबशास्त्र, समाजशास्त्र .... अशा मानवी जीवनाशी निगडीत असलेल्या अनेक शास्त्रांचा उहापोह अनेक चित्र आणि आकृतींसह केला आहे त्यात मानसशास्त्राचा विचारही त्यांनी केला होता हे विशेष. खरंतर त्या काळात हा विषय त्याज्य मानला गेला होता तरीही काळाच्या पुढचा विचार राजवाडे यांनी केला आणि त्यांच्या इतर ग्रंथांबरोबरच हा ग्रंथ दृढनिश्चयाने प्रकाशित केला. इथे त्यांच्या रूढ 'सनातनी' प्रतिमेला त्यांनी स्वतःच छेद दिला का? असा प्रश्न पडतो.


'ईशावास्योपनिषद्भ।ष्य' या ग्रंथात त्यांनी सुरवातीलाच लिहिले आहे; "नासदीयसूक्तात जगतपूर्व काय होते याचा विचार आहे. ईशावास्यात जगतात काय आहे ते दर्शविले आहे". हा ग्रंथ त्यांनी 'निर्द्वंद्व' तत्त्वाच्या  दृष्टीनं अद्वैत मतांचं खंडन करून मराठी भाषेत लिहिला आहे.   

 
विशेष म्हणजे त्यात जवळजवळ शंभर पानांचे लेखन हे भौतिकशास्त्रावर (Physics)आहे. त्यासाठी प्रो.सी.इ.एम.ज्योड、, प्री.जोसेफ नीडहॅम, सर आर्थर एडिंग्टन, प्रो.रसेल, आइन्स्टीन चा सापेक्षतावाद .... अश्या अनेक संशोधकांचे, विचारवंत लेखकांचे, तत्त्वज्ञांचे... संदर्भ या ठिकाणी दिले आहेत. अर्थात सामान्य वाचकाला 'निर्द्वंद्व' सिद्धांताच्या अर्थापर्यंत पोहोचणं तसं सोपं नाही परंतु प्राचीन काळापासून अर्वाचीन काळापर्यंत उलगडत जाणारा प्रचंड 'कालपट' राजवाड्यांच्या लेखनाचा 'आवाका' वाचकांना नेमकेपणाने दर्शवितो हेही तेवढंच महत्त्वाचं  आहे. असे हे वैचारिक संचित पुढल्या पिढ्यांकडे  सुपूर्त करणं आम्हाला महत्वाचं वाटतंम्हणूनच व्यासंगी लेखक, टीकाकार डॉ.रा.शं.वाळिंबे एका सभेत म्हणाले होते, "आहिताग्नि यांच्या ज्ञानाचा महिमा, कर्तृत्त्व  एवढे मोठे होते की; ते गेले आणि सर्व ज्ञानाचे वैभव गेले."

ज्ञानसंग्रह आणि ग्रंथलेखन ही आयुष्याची दिशा ठरल्यानंतर त्यांनी कधीही कुणाचीही चाकरी केली नाही. त्यामुळे आपले विचार निर्भिडपणे मांडणं आणि त्याप्रमाणे आचरण करणं त्यांना शक्य झालं असावं. या संदर्भातील एक आठवण घरातीलडीलधारे सांगत असतात  बडोद्याचे महाराज कै. सयाजीराव गायकवाड यांनी एकदा राजवाड्यांचं   व्याख्यान आपल्या संस्थानात आयोजित केले होते राजवाड्यांनी सुरवातीलाच राजांना सांगितले होते की, "माझं व्याख्यान केवळ दरबारी लोकांसाठी असणार नाही. व्याख्यान अशा ठिकाणी ठेवा जिथे आपली प्रजा येऊ शकेल. माझं व्याख्यान सामान्य जनतेपर्यंत पोचायला हवं."राजांनी त्याप्रमाणे व्याख्यान आयोजित केलं  पण संस्थानांची अशी एक पद्धत होती की, राजांचं  आगमन झाल्यावर त्यांची प्रजा उठून उभी राहत असे. राजवाडे राजांना म्हणाले,"मी आपली प्रजा नाही तेव्हा मी उठून उभा राहणार नाही." राजे म्हणाले; "काही हरकत नाही. व्याख्यानाच्या ठिकाणी मी आधी पोहोचेन आपण नंतर या." असा स्पष्टवक्तेपणा, परखडपणा आहिताग्नि यांच्यापाशी  होता तसंच  विद्वानांचा आदर करण्याचा गुणविशेष राजांमध्ये होता ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. 

अशीच एक आठवण आहे त्यांच्या अमोघ वक्तृत्वाविषयी आत्मवृत्तात आहिताग्नि यांनी म्हटलं आहे; "मी एकदा व्याख्यान सुरु केले म्हणजे मध्यन्तरी तास तास दोन दोन तास खळ नाही, विचार करण्याला फुरसत नाही की शब्द योजण्याला अवकाश नाही. व्याख्यान सुरु झाल्यापासून पहिली पाच दहा मिनिटे फारतर मला त्याचे भान असते पण पुढे तंद्री लागून तीत ते नाहीसे होते. अशा तंद्रीत मग वाक्यामागून वाक्य उच्चारण्यात शब्द अडत नाही, व्याकरणाची चूक होत नाही की विषयाची संगती सुटत नाही. कित्येकांना माझ्या व्याख्यानातील वक्तृत्व पाहून आश्चर्य वाटते." त्यांच्या आत्मवृत्त प्रकाशन समारंभात डॉ.रा.शं. वाळिंबे म्हणाले होते, "आहिताग्नि यांच्या व्याख्यानांसाठी आम्ही तेव्हाचे विद्यार्थी बरोबर वह्या घेऊन जायचो पण टिपणे काय काढणार ? अशक्य गोष्ट होती. त्यांच्या बोलण्याचा वेग प्रचंड, आवाज बुलंद, तेज असे धगधगते - साक्षात अग्नी. राजवाडे सायंकाळी ६. ३० ला गजर झाला की, आपल्या खोलीच्या माडीवरून उतरायचे. त्यांची शिस्तच तशी होती. गजर सुरु झाला की पहिलं पाऊल पडलंच पाहिजे जिना लाकडाचा होता आणि राजवाड्यांचं ते 'पाऊल' त्याचा आवाज व्हायचाच गजर संपे तो जिना संपे आणि मग अर्ध्या सेकंदात आसनावर बसायचे. त्यापुढे दीड तास माणसं आपल्या विश्वात नसायची."याच्या पुढली हकिकत अशी की, दीड तासानंतर दुसरा गजर व्हायचा आणि गजर संपेतो व्याख्यानाचीही सांगता व्हायची. खरोखरच वेळेच्या या अचूक नियोजनाला, अंदाजाला काय म्हणावे ?         

आहिताग्नि आपल्या वाड्याच्या चौकात ज्ञानसत्र भरवीत असत. अनेक विद्वानांच्या व्याख्यानांनी चौक गाजत राहिला. अनेक विषयांच्या चर्चा इथं रंगल्या. टोकाचे वादविवाद झडले. परंतु विरोधी मतांचा, विचारांचा आदर करण्याची सहिष्णुता तेव्हाच्या समाजात होती. हे तेव्हाच्या विचारवंतांचं भाग्यच !. अशा या वाड्यात लोकमान्य टिळक येऊन गेले, इतिहासाचार्य राजवाडे कामानिमित्त मुक्कामाला येत असत आणि महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार व्याख्यानाच्यावेळी  श्रोत्यांमध्ये बसल्याचा आठवणी काहीजण सांगत असतात. खरोखर हा वाडा  सर्वार्थानं 'जागता' होता. ते एक ज्ञानमंदिरच होतं. या ज्ञान- मंदिराचं पुजारीपण त्यांनी निष्ठेनं सांभाळलं .


याच वाड्याच्या चौकात १९३२- ३३ च्या दरम्यान व्याख्यानाचा विषय होता 'फ्रेंच राज्यक्रांती'. तत्त्वज्ञानाबरोबरच इतिहास हाही  त्यांच्या अभ्यासाचा आणि प्रेमाचा विषय. शिवाजीमहाराज आणि नेपोलियन बोनापार्ट हे त्यांचे 'हिरो' होते. एका शारदीय ज्ञान सत्रात त्यांनी 'फ्रेंच राज्यक्रांती' हा विषय निवडला त्यासाठी फ्रेंच भाषेचा अभ्यास केला आणि फ्रेंच भाषेतूनच इतिहास वाचला, अभ्यासाला. व्याख्यानाचा कालावधी किती होता? एक दिवस नाही, दोन दिवस नाही तर तब्बल महिनाभर या विषयावर त्यांनी व्याख्याने दिली होती हा इतिहास, त्यातले योद्धे, विचारवंत सारीच नावं सामान्यांसाठी परकी, अनोळखी, या लोकांनी राज्यक्रांतीतील कुणाचे फोटो पाहण्याचीही शक्यता नव्हती."माझे विचार सामांन्यापर्यंत पोहोचायला हवेत." असं आहिताग्नि नेहमीच म्हणत असत. याच विचारातून आपली मुलगी कु.शकुंतला (माझ्या सासूबाई- शकुंतला आठवले) हिच्या कडून त्यांनी एकशेएक व्यक्तिचित्रं  काढून घेतली. शिसवी लाकडाच्या फ्रेम्स बनवून व्याख्यानाच्यावेळी ही सर्व चित्रं चौकात लावली होती. हेतू हा की, आपण राज्यक्रांतीतील कुठ्ल्या व्यक्ती विषयी बोलतो आहोत हे श्रोत्यांना कळावं आणि त्यांना व्याख्यानात रस वाटावा. एवढी चित्रं रेखाटणं  हे काम शकुंतलासाठी सोपं नव्हतं. कारण चित्रकलेचं फारसं मार्गदर्शन तिला मिळालं नव्हतं पण उपजत चित्रकला तिच्या बोटात होती आणि आवश्यक नजरही होती. त्यामुळे चार, पाच इंचाच्या मूळ फोटोवरून तिने दीड दोन फूट  लांबी, रुंदीची व्यक्तिचित्रं काढली. व्याख्यानानंतर १९३५ साली आहिताग्नि यांनी  पुन्हा या चित्रांचं  प्रदर्शन वाड्याच्या चौकात भरवलं होतं.त्यानिमित्तानं  एक पुस्तिकाही प्रकाशित केली, तिची  किंमत होती एक आणा. पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक लोकं प्रदर्शन पाहून गेले, त्यात इंग्रज अधिकारीही होते. कॉलेजमध्ये शिकणाऱ्या या विद्यार्थिनीची चित्रं पाहून सर्वाना आश्चर्य वाटलं आणि कौतुकही !  राजवाड्यानी लेकीला शाबासकी देत तिचा सत्कार घडवून आणला. फार दूरदृष्टीनं 'visual'या माध्यमाचा त्यांनी केवढा विचार केला होता, हे आज लक्षात येतंय.


ज्ञानोपासना  हे त्यांचं जीवितकार्य होतं, विधात्यानं दिलेला तो कौल होता. तरीही स्वातंत्र्यपूर्व काळातील सामाजिक, राजकीय प्रश्नांपासून ते कधी दूर गेले नाहीत; कायमच संवेदनशील राहिले. स्वातंत्र्यनिष्ठा, न्याय, नीती .... अशा मूल्यांविषयी त्यांना विलक्षण आदर होता. असे आहिताग्नि सुरवातीच्या काळात मेळ्यांमध्येही सहभागी झाले होते 'रंजनातून - लोकशिक्षण , लोकजागृती' असं तेव्हाच्या मेळ्यांचं  ब्रीदवाक्य असे, मग दारुबंदीसारखा विषय असेल किंवा परदेशी कपड्यांची होळी... फर्ग्युसन कॉलेज मध्ये असताना १९०८ साली पुण्यात शिवराज्यरोहणाचा उत्सव होता. 'विद्यार्थ्यांनी राजकीय सभांमध्ये भाग घेऊ नये' असा कॉलेजचा नियम असूनही त्या सभेत आहिताग्नि यांनी निबंधवाचन केलं. नियमभंग केल्याबद्दल त्यांना कॉलेज सोडावं लागलं. फर्ग्युसन कॉलेज सोडून ते डेक्कन कॉलेजात गेले, पण आपल्या विचारांशी ठाम राहिले.

नंतरच्या काळात ते म्हणायचे, "इतिहास आणि तत्त्वज्ञान  हे माझे विषय आहेत, राजकारण हा माझा विषय नाही" स्वतःची अशी प्रतिमा तयार करून ते छुपेपणानं क्रांतिकारकांना मदत करत राहिले. त्यांचे जेष्ठ चिरंजीव राजाराम यांना  त्यांनी त्याकाळी बॉम्ब तयार करण्यासाठी प्रोत्साहन दिलं होतं. वाड्यात सर्व साहित्य जमा झालं एव्हढ्यात पोलिसाना सुगावा लागला. पोलीस येत आहेत  ही बातमी कशी कुणास ठाऊक वाड्यावर पोचली.  लगेचच सर्व साहित्याची विल्हेवाट लावण्यात आली. पोलिसांना कुठलाही पुरावा सापडला नाही तरीही राजाराम यांना दोन वर्षांची कडक शिक्षा भोगावी लागली. अशा प्रसंगीही आहिताग्नि विचलित झाले नाहीत. इंग्रजांना त्यांचा संशय असूनही इंग्रज त्यांना कधीही कुठल्याही रीतीनं अडकवू शकले नाहीत. असे हे आहिताग्नि जाणकार रसिक होते. काव्य, साहित्य, संगीत, नाटक, क्रिकेट .... अशा अनेक विषयात त्यांना रस होता. आपल्या ईप्सित कार्याकडे वळण्यापूर्वी त्यांनी रात्ररात्रभर गायन मैफिली ऐकल्या, संगीत नाटकं पहिली होती. वाडाच्या चौकात ज्ञानसत्राबरोबरच त्यांनी गायन - वादनाचा मैफिलीही आयोजित केल्या होत्या. पण आहिताग्नि इथंच थांबले नाहीत. आपल्या मुलींना महाविद्यालयीन शिक्षणाबरोबरच कलेच्या शिक्षणासाठीही त्यांनी प्रोत्साहन दिलं. त्यांच्या सूनबाई  कै.उर्मिला सिताराम राजवाडे यांना गाण्याची आवड होती, उपजतच गोड गळा त्यांना लाभला होता. त्यांनाही आहिताग्नि यांनी गाणे शिकण्यासाठी पाठवलं होतं. खरोखरच त्यांच्या  'सनातन'पणाची जातकुळी कुठली? असा प्रश्न पडतो.

        एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो की, कै.प्रो.वैजनाथ काशिनाथ राजवाडे (जन्म १८६०), कै.विश्वनाथ काशिनाथ राजवाडे (जन्म १८६३) आणि कै. शंकर रामचंद्र राजवाडे (जन्म १८७९) हे तीन व्यासंगी विद्वान एकाच काळात, एकाच घराण्यात जन्माला यावेत हा निसर्गाचा चमत्कार म्हणावा लागेल यास्काचार्यांच्या निरुक्ताचें संशोधन करणारे आणि भाषांतर करणारे भाषापंडित वै.का.राजवाडे, इतिहासाचार्य म्हणून आदरणीय असलेले वि.का.राजवाडे आणि आहिताग्नि राजवाडे असं  हे राजवाडे घराणं.


या घराण्यातील आहिताग्नि राजवाडे यांची पुढल्या पिढ्यांना ओळख व्हावी, अभ्यासकांना, विचारवंतांना त्यांचं काही लेखन उपलब्ध करून द्यावं, या प्रामाणिक हेतूनं  या संकेतस्थळाची आम्ही निर्मिती केली आहे. शेवटी एवढंच म्हणावसं वाटतं की, राजवाडे यांनी प्रचलित विचारांना, सिद्धांतांना आव्हान देत नवा सिद्धांत मांडला. भविष्यात असे एखादे व्यासंगी विद्वान जन्माला येतील जे आहिताग्नि  यांच्या  विचारांना 'निर्द्वंद्व' सिद्धांताला आव्हान देत, तो खोडून काढत नवा सिद्धांत मांडतील. बौद्धिक वाद - चर्चांचं  हे चक्र असंच  चालू रहाणं  हेच सुदृढ समाजाचं लक्षण आहे.


या आपल्या  शब्दभेटीतून आहिताग्नि काहीसे ओळखीचे तरीही अनोळखी अशा सीमारेषेवर तुम्हाला भेटतील. कारण आहिताग्नि तत्वज्ञ होते, इतिहासाचे अभ्यासक होते, वक्ते होते, भाषाप्रभू होते, जाणकार रसिक होते, दृढनिश्चयी तसेच स्पष्टवक्ते होते, सनातनी होते, सुधारकही होते .... आणि परंतु ते कोण होते हा प्रश्न शिल्लक उरतोच.  हीच त्यांची ओळख आहे.


धन्यवाद
अहिताग्नि राजवाडे परिवारातर्फे
शैला मुकुंद


आवाहन - आहिताग्नि राजवाडे यांचे काही अप्रकाशित लेखन, हस्तलिखितं आपल्याकडे असल्यास कृपया या संकेतस्थळावर संपर्क साधावा.

 


 
© www.ahitagni-rajwade.com
Developed By Maitraee Graphics